Search This Blog

Sunday, 25 March 2018

ध्येय कधी सोडू नको !!!


ध्येय कधी सोडू नको !!!



काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य

पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य,

नशीबाला शिव्या देत,

प्रयत्नांना मुकरु  नको

काटेरी मार्ग असेल ,पण ध्येय कधी सोडू नको !!!



जागोजागी मिळतील वैरी, नको त्याची भ्रांत

लक्ष्य ध्यानात ठेव,तू चाल रे निवांत ,

शत्रूना घाबरत,

मान कुठेही झुकवू नको

काटेरी मार्ग असेल ,पण  ध्येय कधी सोडू नको !!!



मन आहे चंचल,नाही ते स्थिर

हरत आहेस तरी,तू नको रे सोडू धीर,

अपयशाला बघून,

लक्ष कधी विसरू नको

काटेरी मार्ग असेल ,पण ध्येय कधी सोडू नको !!!


जन्मला आहे तर जग, नको पाहू मागे

आयुष्याचा  शेवटी बाकी फक्त आठवणींचे धागे

माणूस म्हणून जगला,

पण सामान्य माणूस  म्हणून मरू नको

काटेरी मार्ग असेल ,पण  ध्येय कधी सोडू नको  !!!

Friday, 23 March 2018

झेवियर कॉलेज...एक ग्लॅमरस दुनिया.



झेवियर कॉलेज...एक ग्लॅमरस दुनिया.



       मुंबईत पोचलो तेव्हा पावासाला धडाक्यात सुरुवात झाली होती. शनिवारची ती रात्र होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी १० वाजता प्रेवश परीक्षा होती.कॉलेजमधे पोचलो तेव्हा पूर्ण कॉलेज अगदी सुनसान होतं. क्लास मधे आलो, परीक्षा दिली आणि परत निघालो. मात्र तिथुन विचारचक्र सुरु झालं. कॉलेज ची बिल्डिंग बघूनच धढकी भरली होती. दोन तीन लोक आजुबाजुला होती ती पण इंग्रजीत बोलनारी. आपला काही इथे निभाव लागणार नाही अस वाटल. आणि आलो तसं परत निघावं हां विचार केला. दोन दिवसांनी फोन आला. "तुम्ही एडमिशन कधी करू शकता" ! तेव्हा खर तर आनंद झाला होता. पण दडपनही आलं होतं. म्हटलं, करून बघायला काय हरकत आहे. आणि झेवियर मधे प्रवेश झाला. 


                 इथे आल्यावर वाटल या कॉलेज ला कुठेतरी पाहिलं आहे. मग आठवल अरेच्चा ! हे तर तेच कॉलेज आहे जे आपण अनेकदा "ती सध्या काय करते"  , "जाने तू या जाने ना" या मुव्ही मधे होत. खुप भारी वाटलं तेव्हा. आणि स्वतःवर थोड़ा गर्वहि झाला की आपण या कॉलेजमध प्रवेश मिळवला. भीती कायम होती. कारण आपण जिथुन आलोय ते जग खुप वेगळ आहे. हे जग खूपच वेगळ. इथले फक्त इंग्लिशमधे बोलणारे मूलमुली,  त्यांचं राहणिमान, त्यांची स्टाईल बोलन्याची पद्धत सगळच खुप वेगळ होत. अस वाटत होत की कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग सुरु आहे आणि एक रोल आपणही करतोय.पण हा रोल नसून खरखुर आयुष्य आपण जगतोय यांची जाणीव होती. आणि कॉलेज लाइफ काय असत, (जस आपण टीव्ही किंवा मूवीज मधे बघतो तसं) हे इथे आल्यावर कळल. आपलं ते जागायच राहून गेल होतं म्हणून आपल्याला हा चान्स मिळाला अस कायम वाटत राहातं. 
                   इथे आल्यावर कळल की हे लोकं पन आपल्यासारखेच आहे. मराठी बोलणारे सुद्धा खुप लोकं आहेत इथे. इथले व्यवस्थापन, सर्व कॉलेज स्टाफ मला आतापर्यंत मिळालेला सर्वात ऊत्तम असा हा स्टाफ होता. एक परिवारच आहे तो माझ्यासाठी. भारत भरातून आलेले अनेक मूल मुलीं इथे भेटले छान मैत्री झाली. आपल्या सारखेच ते सुद्धा अनेक स्वप्न घेऊन या ग्लॅमरस जागेत आले आहेत हे कळलं तेव्हा जास्त आपलेपना जानवला . बेडकाला आपली विहीर म्हणजेच सगळ जग वाटत असतं. पण त्यातून बाहेर आल की जग काय आहे हे कळत, त्याचा   विस्तार किती मोठा आहे हे जाणवत. इथल्या मुलांचे विचार , जीवनाकड़े पाहन्याची त्यांची दृष्टी, धडपड करण्याची वृत्ती बघून आपणही काहितरी करू शकतो ही जाणिव इथे येऊन झाली.आपल्या सारखी अनेक मांडळी इथे येऊन गेली आणि आज यशाच्या ऊंच अशा शिखरावर ती उभी आहेत. हे पाहिल की अजुन हुरूप येतो, इथे आल्याच समाधान मिळतं, इथल्या झगमगत्या दुनियेचा एक भाग झाल्याचा खुप आनंद होतो.    

शब्दांकन: अतुल चव्हाण 

शंकरा... उघड तिसरा डोळा


शंकरा... उघड  तिसरा  डोळा 



निव्वळ पुरोगामी विचारांचे नाही तर शिक्षित असूनदेखील अशिक्षितांसारखे वागणारे लोक समाजात बदल करण्याचं सोडून स्वत:देखील त्यात सहभागी होतात. महाराष्ट्रातील बहुतांश लोक हे धर्मसत्तेत बुडालेले आहेत. बरेचसे लोक आसतिक आहेत. काही लोक नासतिक आहेत. आसतिक लोकांपैकी काही लोक मन:शांतीसाठी देवदर्शन करतात. काही लोकांना खरोखरंच देवावर विश्वास आहे आणि अनुभवदेखील आहे. परंतु मंदिरातील भक्तांच्या भक्तीने देवाचा श्वासदेखील गुदमरतोय एवढी अतिशयोक्ती काही लोक करतात.काही माणसे इतकी अंधश्रद्धाळू असतात ते विचार न करता गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि लोकांच्या भक्तीचा फायदा घेत काही लोक त्याचा धंदा करतात.
काही लोक तर देवाला इतकं कवटाळतात की देवाचा श्वास गुदमरतोय की काय असे वाटते. आपल्याला जीवन देणारा देवचं आता लोकांकडे जीवनदान मागतोय असं मला वाटतंय. एकीकडे देवाच्या पवित्रतेचे महत्त्व समजावणारे लोक स्वत: देवाची विटंबना करतात. मिठी मारतात. चार दिवस मासिकपाळीच्या वेळी बाईला लांब बसवून तिला तुच्ठ लेखणारे लोक स्वत: प्रवास करून, चालत येत असताना त्यांना किती महिलांचा धक्का लागत असेल ही झाली पहिली बाजू आणि रोजगार मिळण्याच्या नादात कित्येक महिला ज्यांच पोट हे यावर भरत असेल त्या फुलं तोडण्याचं काम करत असतील शिवाय फुलविक्रेत्या महिला, प्रेतावरून येणारी जाणारी लोक थोडी सांगणार आहेत की आम्हाला शिवू नका. एवढ्या गर्दीत धक्काबुक्की होणारचं.
तसंच माझ्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण म्हणजे बागुलनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी होणारी भक्तांची गर्दी. माझं स्वत:च वैयक्तिक मत असं आहे की देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा नाही. आपल्या भक्तीचे प्रदर्शन लोकांना का करायचं. भक्ती असावी. ज्याने आपल्याला घडवलं त्याला मनापासून नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार घालावा. त्याला इतकंच बोला तुझी सेवा माझ्या हातून चांगल्या पद्धतीने घडवून घे बघा कसा पाठीशी उभा राहतो तो. चुकली माखली सेवा माफ कर अस बोलून दर वेळी तुम्ही चुका करणार. तो देव आहे. उत्पत्ती- विनाश त्याच्याच हातात आहे हे लक्षात असू द्या.
पाऊण तास आरतीसाठी रांग थांबली तर काही लोक खरचं भक्तीपोटी प्रतिक्षा करतात पण भक्तीचे अवडंबर माजवणारे लोक बडबडतात. म्हणजेच ते मनापासून देवदर्शन करत नाही तर दिखावा करतात. खरचं जर सहजासहजी देव भेटला तर जीवन धन्यच होईल नाही का? एवढंच नाही तर हेच लोक गाभा-यात जाऊन स्वत:च्या समाधानासाठी व्यवस्थित पाया पडायला भेटलं नाही म्हणून पुढे जाऊन फुलं अक्षरश: फेकतात. काही लोक तर दुधाच्या पिशव्या जसं रंगाच्या रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर फोडतात अगदी तसंच महादेवाच्या अंगावर त्यांचा अभिषेक करतात. याला खरंच अभिषेक म्हणतात का? तुम्हीच सांगा आता. असे बावळट लोक स्वत:च्या समाधानासाठी देवाची विटंबना करतात हे सत्य आहे. देवाकडे थोडीशी बुद्धी मागितली असती तर बर झालं असतं नाही का?
भक्तीचं अवडंबर माजवणा-या लोकांनी या सर्व गोष्टींचा खरच मनापासून विचार केला पाहिजे. आपण काय करतोय हे लक्षात घेतले पाहिजे. देव बोलत नाही माझ्यासाठी हे केलंच पाहिजे. हा तुमचा भाव आहे. पण त्याचा अतिरेक नको व्हायला. हा मेसेज १० जणांना पाठवला तर चांगली बातमी आज कानावर येईल असं हल्ली सर्रास चालू आहे. खरंच असं झालं असतं तर घरबसल्या मी हेच केलं असतं. श्रद्धेचा बाजार नका करू. मनापासून भक्ती करा. नाही तर खरंच शंकर तिसरा डोळा उघडून सर्व भस्मसात करेल.

शब्दांकन: अमृता घुमरे-कारेकर 


मला भेटलेली माणसं...


मला भेटलेली माणसं...


काही माणसं कशी असतात ना? क्षणोक्षणी रंग बदलत असतात. सतत त्यांचा वाईटपणा चांगुलपणाच्या आड येत असतो. का कोणास ठाऊक पण कधी ती इतकी चांगली वागतात की आपण त्यांच्याशी आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्यांना मनमोकळेपणाने सांगतो. पण नंतर आपल्या लक्षात येतं की आपण चुकिच्या व्यक्तीशी हितगुज साधतोय.
खरचं प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात किती फरक असतो ना? वेगवेगळी माणसं भेटतात. त्यांच्यात संवाद होतो. मैत्री होते. भेटीगाठी वाढतात. मग मतभेद होतात. त्यानंतर वाद होतोत. काहीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं ही शेवटपर्यंत आपली साथ देतात. निर्मळ, निस्वार्थ, प्रेमळ नाती फक्त तीच टिकवू शकतात मग ते मैत्रीचं नातं असो, प्रेमाचं असो, नवरा बायकोचं असो नाहीतर इतर कोणतंही नातं असो. अर्थात त्यासाठी एकमेकांचे स्वभाव जुळणे महत्त्वाचे. तेव्हाच मत जुळतात. थोडेफार मतभेद चालायचेचं. कारण कोणत्याही व्यक्तीच्या राहण्यात, वावरण्यात, खाण्यापिण्यात भिन्नता आढळणारचं. आणि मनं किती जरी जुळली तरी  थोडाफार विचारांमध्ये फरकं असणारच नां?
मजेदार गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने आपण स्वत: बरोबर आहोत असे सर्वांना वाटत असते. पण काही लोक प्रामाणिकपणे आपल्या चुका मान्य करतात तर काही लोक आपण चुकतोय हे माहित असूनदेखील दुस-यांच्या चुका दाखवून देऊन स्वत:ची चुक पडद्याआड करतात.
काही लोकांमध्ये साम्य असतं कारण त्यांच्या काही सवयी, आवडीनिवडी, माणसांना परखण्याची  खासियत असते. ते स्वत:च मान्य करतात की आपण एकमेकांसारखेच आहोत. पण त्यांच्यात साम्य अजिबात नसतं. हि माणसाची वृत्ती असते. तो कधी स्वार्थी-निस्वार्थी, विश्वासघातकी- विश्वासू, प्रेमळ- रागीट होईल सांगू शकत नाही.
मला इतकंच वाटतयं की माणसाने मीपणा, अहमपणा सोडला की सगळं नीट होईल. आपोआपचं दुस-यांच सुख-दुख: आपलं मानून स्वत:च्या चुकांची कबूली देण्यात जे मोठेपणं आहे ते दुसरं कशातचं नाही.

शब्दांकन: अमृता घुमरे-कारेकर 
    

मुंबई....

मुंबई...



     नुकतचं  मुंबई दिनांक हे अरुण साधूं नी लिहिलेलं पुस्तक वाचलं. राजकारणाच्या किती विविध छटा असतात आणि त्यामधे किती वेगवेगळ्या पातळीवर अनेक लोकं गुंतलेले असतात हे संगणारी ही कथा.मुंबईमधे घड़नारी ही कथा मुंबईच्या अनेक वेगवेगळ्या रूपाचे सुद्धा दर्शन घडवते. मुंबईला स्वप्ननगरी का म्हणतात ते ही कुठेतरी प्रत्ययाला येतं. मुंबईत आपलं नशिब आजमवायला रोज अनेक लोकं येतात. फुटपाथवार झोपुन दिवस काढतात. आणि एक दिवस मोठ्या बंगल्याचे मालकही होतात. पहिल्यांदा मुंबईत आल्यावर ही मुंबई एकदम आंगावर आल्यासारखी वाटते. धावाणारे लोकं, पायाला चाक लावून सतत इकडून तिकडे पळतायेत. का? कशासाठी? याची उत्तर ज्याची त्यांनी शोधायची. चार दिवस मुंबई फिरायला येणाऱ्यांना हे शहर खुप वेगळ वाटतं. खुप ग्लैमरस, हवहवसं ,एकदम भन्नाट! वाटतं इथेच येऊन राहाव, इथल्या जगाचा आपणही भाग व्हाव. आणि एक दिवस खरच आपल्यावर तशी वेळ येते. आपण आपला बोरा-बिस्तरा उचलून मुंबई गठतो. मनात अनेक स्वप्न, अनेक आशा घेऊन !आपल्यालाही वाटतं की आपण एक दिवस या मुंबईचा भाग होउ. आपल्याही नकळत आपण या शहराचा भाग बनूनहि जातो. इथल्या गर्दीत मिसळून जातो. एक चक्र आपल्याही पायाला लागतं.
                    फार विचित्र वाटतं हे शहर कधी कधी. खुप चीड़ येते इथल्या गर्दीची, सतत घामेजुन  टाकणाऱ्या वातावरणाची, कायम धावायला लावणाऱ्या परिस्थितिची, स्वतलाही विसरायला लावणाऱ्या धडपडीची. पण... त्याच वेळी आपण प्रेमातही पडतो या मुंबईच्या. समुद्र किणाऱ्यावर येऊन बसल की जाणवतं या शाहराच सौंदर्य. असंख्य लाटा किणाऱ्यावर येऊन धडकतात तसे असंख्य लोक मुंबईत येतात आणि इथलेच होऊन जातात. मग याच गर्दीची सवय व्हायला लागते. धावता धावता स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी आपल्यात निर्माण होते. अनेक अनोळखी चेहरे मग आपलेसे वाटू लागतात. घडयाळाच्या काट्यावर चालायला , वेळेच गणित जमवायला, वेळ पाळायला हे शहर आपल्याला शिकवतं. धो धो कोसळत राहणारा पाऊस, पावसात अड़कल्यावर एकमेकांना मदत करणारे अनेक हात, लोकललाच आपलं दूसरं घर माननारे, त्या लोकलच्या धावत्या  चाकावर सण-उत्सव साजरे करणारे मुंबईकर. आपल्याला आपल्याच आयुष्यचा एक भाग वाटू लागतात. आणि आपणही होउंन जातो एक मुंबईकर.

शब्दांकन: अतुल चव्हाण 

हुंडाविरोधात कायदा करून मासिकतेत बदल नाही...


हुंडाविरोधात कायदा करून मासिकतेत बदल नाही...


 विवाह सोहळ्यात हुंडा देणे आणि घेणे बंद होण्यासाठी १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आणला. हुंडा घेणे व घेणे हा कायद्याने गुन्हा ठरण्यात आला.मात्रतरी सुद्धा वराकडील मंडळी कडून वधुपित्याकडून सर्रास हुंड्याची आजही मागणी केली जाते. आपल्या मुलीच्या संसारासाठी कर्जबाजारी झालो तरी चालेल पण मुलीचा संसार सुखात जावा या साठी वधुपित्याकडून या मागणीला होकर दिला जातो.
पूर्वी मुलीच्या लग्न साठी मोठ्याप्रमाणात हुंडा देण्याची प्रथा होती. या प्रथेचे आज इतके अवडंबर माजले आहे कि मुलीच्या वडिलाना अनेकदा घर शेती गहाण ठेऊन हुंड्यासाठी पैस्यांचीसोयकरावी;लागते .शेवटी कर्जात बुडून गेलेल्या पित्याला आत्महत्या करण्याशीय कोणताच पर्याय नसतो . वर्तमानपत्रात रोज एकतरी हुंडाबळीची बातमी वाचनात येतेच. या एकविसाव्या शतकातही हुंड्याची प्रथा आपल्या समाजात चालू आहे आणि त्यासाठी आजही रोज विवाहितांचालेकीसुनांचा बळी जात आहे. कधी सासरचे तिला पैशासाठी आगीच्या ज्वाळांत ढकलून देतातविष देऊन तिची हत्या करतातनदी-विहिरीत ढकलून देतात किंवा मग तिचा इतका मानसिक आणि शारिरीक छळ करतात की ती बिचारी मृत्यूला जवळ करते.
            हुंडयामुळे आत्महत्या केलेले हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. राज्यात दररोज अशा किती घटना घडतातयाची गणतीच न केलेली बरी. विदर्भमराठवाडयात शेतकरी आत्महत्या करतातया पाठीमागचे कारणही हेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आज विदर्भ-मराठवाडयात कितीही गरीब कुटुंब असोकिमान दोन ते तीन लाख रुपये हुंडा दिला-घेतला जातोचअशी परिस्थिती आहे. त्यात जर नवरा मुलगा पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर त्याचा भाव खूपच जास्त म्हणजे किमान ८-१० लाखांच्या घरात असतो. मुलगी सुखात राहावीयासाठी प्रसंगी शेती गहाण ठेऊन सावकारांकडून अवाच्या सव्वा टक्केवारीने कर्ज घेतले जाते. पीक गेल्यानंतर कर्ज फेडूअसे गृहीत धरलेले असते. मात्रपावसाच्या लहरीपणामुळे पीक पाण्यात तरी जाते किंवा पाण्याविना जळून तरी जाते. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग पत्करतात. लग्न हे दोन मानाचंगे दोन कुटुंबांचे मिलन आहे पण हुंडा प्रथेने या विवाहसंस्थेचा बाजार केला आहे.सोनेचांदी गाड्या जेवणावळीच्या अटींवर लग्न ठरू लागले .


        नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या अहवालानुसारच महाराष्ट्रात ३५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण न झाल्यामुळे न्यायालयात आरोपपत्रच दाखल होत नाही. छळाच्या दाखल झालेल्या एकूण तक्रारी बघितल्या तरी त्यातील दोन टक्के आरोपींनाही शिक्षा होत नसल्याचे आकडेवारी सांगते.हुंडा’ हा स्त्रीयांसाठी जीवघेणा आहे आणि त्यासाठी स्त्रीयांनाच लढा द्यायचा आहे. प्रत्येक मुलीने जर ‘हुंडा न घेणा-या मुलाशीच लग्न करणार’अशी शपथ घेतली तरच हुंडाबळी संपण्यास मदत होईल. आणि ख-या अर्थाने ‘बेटी बचाव’ उपक्रम साध्य होईल.त्याबरोबरच आजच्या तरूण पिढीने स्वबळावरस्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वाभिमानाने स्वतःची प्रगती करण्यावर भर दिला पाहिजे आणि असे करताना हुंडा न घेण्याची शपथ घ्यायला हवी तसेच तरुणींनी  हुंडा घेणार्‍या आणि मागणार्‍यांना स्वतःच नकार द्यायचे धाडस अंगी निर्माण करायला हवेतरच समाजाचे हळूहळू का असेना पण सकारात्मक परीवर्तन होईल आणि हुंडाबळीचे प्रमाण कमी होईल.

शब्दांकन: अश्विनी सुतार 

समाज आणि देशाचा खरा चेहरा कधी दिसणार...?


समाज आणि देशाचा खरा चेहरा कधी दिसणार..?




        मीडियाचा  असा दावा आहे की मीडिया  हा  समाज आणि  देशाचा आरसा आहे.  जे देशात, समाजात घडतं ते मीडियात दाखवलं जात. पण मीडियामध्ये समाजाचा आणि देशाचा जसाच्या तसा चेहरा दिसतो  का...??? तर याच उत्तर मला तरी 'नाही' अस वाटतं.  मला भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील हा विरोधाभास दिसतो की, तत्कालीन समाजसुधारकांनी अत्यंत छोट्या प्रमाणात निर्माण केलेल्या वृत्तपत्राकाने मोठ्या प्रमाणात सामजिक चळवळी उभ्या केल्या.  मात्र आजच्या काळात मीडियाची विविध रुपे (प्रिंट, टी.व्ही. वेब),  मोठ्या प्रमाणात विस्तारली असूनही अगदी मोजक्या प्रमाणात सामाजिक चळवळी चालवण्याचा प्रयत्न मिडिया करत आहे.  गेल्या काही दशकभरात मिडिया क्षेत्र हे व्यावसायिक क्षेत्र झाल्याच दिसत आहे. सध्याच सरकार कशाप्रकारे काम करत आहे याची कल्पना सर्वांना आहेच. काही प्रसारमाध्यमांनी तर सरकारच्या वाईट  धोरणांना लपवण्याचा आणि सरकारच्या विरोधकांना अक्षरशः दाबण्याचा प्रयत्न केला आहे. अशी  गुलामगिरी पत्करुन  सरकारच्या  ताटाखालचे मांजर म्हणून काम करणाऱ्या काही प्रसारमाध्यमांच्या संस्था आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या  अशा सरकारच्या आडमुठे धोरणाखाली आजचा नवोदित पत्रकार घडत आहे. आज माझ्यासारखे अनेक तरुण -तरुणी मीडियाची आवड किंवा ध्येय घेवून प्रसारमाध्यमात काम  करण्याच्या उद्देशाने येत आहेत . समोरील सर्व आव्हाने आणि  समस्या जरी काही प्रमाणात कळत असल्या तरी या समस्या आणि आव्हानांच्या प्रलयकारी लाटांवर स्वार होऊन सामजिक जबाबदारी आणि कर्तव्याबद्दलची प्रमाणिकता यांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार. 

      शेवटी या साऱ्याच्या केंद्रस्थानी आहे तो सामान्य माणुस. सामान्य माणसाचे प्रश्न आहेत तरी काय? आज भारतात  सुशिक्षित बेरोजगारी, दरिद्रय, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण विकास, महिला सबलीकरण यांसारखे अनेक प्रश्न विकासाच्या आड येत आहेत.  याबद्दलची समाजातील  वास्तविकता  प्रसारमाध्यमांमार्फ़त निदर्शनास यावी यासाठी प्रसारमाध्यमात बॉलीवुड, राजकीय, विज्ञान-तंत्रज्ञान, इ. सारखी बिट्स आहेत अगदी तसच बेरोजगारी आणि ग्रामीण विकास या बिट्स वर स्वतंत्र काम करणारे करस्पॉण्डन्स हवे आहेत. यामुळे ग्रामीण विकास आणि बेरोजगारी   यांसारख्या प्रश्नाचे खरे वास्तव समोर येवून सकारात्मक परिणाम दिसु लागतील. आणि मगच मीडियामधे समाज आणि देशाचा  खरा  चेहरा दिसु लागेल.

शब्दांकन : सौरभ खांडगे 

(हृदय)विकार विचारांचे


(हृदय)विकार विचारांचे 



माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. माध्यमामध्ये समाजाचा जसाच्या तसा चेहरा दिसतो. मात्र या दोन घटनेचे माध्यमांमधून जे चित्रण केले गेले यामुळे या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे दिसत आहे. दिनांक २५ पेâब्रुवारी रोजी सकाळी व्हॉट्सअपवर बातमी आली, भारतीय सिनेतारका श्रीदेवी ५४) हिचे दुबई येथेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवसभर श्रीदेवीच्या निधनाची बातमी प्रत्येक माध्य्ूामांवर दाखविण्यात येत होती. श्रीदेवीचे पुर्वायुष्य दाखविण्यात येत होते. श्रीदेवीने काम केलेल्या वेगवेगळया चित्रपटातील भुमिकेची तारीफ केली. श्रीदेवीला श्रध्दांजली म्हणून चित्रपटात तिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांची मालिका दाखविण्यात आली. एवढी सौदर्यसंपन्न सिनेतारकाअचानक आपल्यातून निघून गेल्याबद्दल तिच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. श्रीदेवीचे पार्थिव दुस-या दिवशीमुंबईत आणणार याची बातमी कळताच तिचे चाहते अंत्यदर्शनासाठी मुंबईत मोठया संख्येने हजर झाले. कलाकारांना आपल्या चेह-याची व शरीराची ओळख कायम आवश्यक असते. याकरीता ते प्लॅस्टिकसर्जरी, डाएट, स्टेरॉइड्स वगैरेंचा कमी अधिक प्रमाणात वापर करतात. श्रीदेवीने देखील आपले सौदर्य जपण्यासाठी यातीलकाही गोष्टींचा वापर केला होता. याचा विपरीत परिणाम होऊन श्रीदेवी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, याबाबत वेगवेगळया माध्यमांतून तज्ञांसोबत चर्चा घडविण्यात आल्या. शेवटी यासर्वांचा परिणाम म्हणून व श्रीदेवी मानसिक तणावाखाली वावरत असल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला यावर माध्यमांनी शिक्कामोर्तब केले. दिनांक २६ पेâब्र ुवारी रोजी माध्यमांवर बातमी आली श्रीदेवीचा मृत्यु बाथटब मध्ये पडून झाला. त्यावेळी त्यांनीमदयपान केले असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे पती बोनी कपूर हे देखिल त्यांचे सोबत असल्याचे सांगितले. श्रीदेवीच्या मृत्युचीपुर्ण चैकशी झाल्याशिवाय पार्थिव मुंबईला घेऊन जाण्याची परवानगी दुबई पोलीसांनी नाकारली होती. पुन्हा एकदा माध्यमांवरश्रीदेवी यांच्या मृत्युच्या कारणांबाबतच्या चर्चेला उधाण आले. निरनिराळे तर्वâ वितर्वâ मांडले जाऊ लागले. चर्चा घडवून आणल्यागेल्या. अखेरीस दिनांक २७पेâब्र ुवारीला श्रीदेवीचे पार्थिव मु ंबईला आले व दुस/या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक २७ पेâब्रुवारीला वरळी, मुंबई येथील इयत्ता दहावीत शिकणारा व बालपणीच वडीलांचे छत्र हरविलेलाहरहुन्नरी मुलगा ऋतिक घडशी १५) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची बातमी आली. दुसNया दिवशी त्याचा दहावीचा पहिला पेपर होता. आदल्या दिवशी होळीची थोडीशी दंगामस्ती केल्यावर रात्री जेवून झोपी गेलेल्या ऋतिकला दिडच्यासुमारास निद्रिस्त अवस्थेत काहीतरी त्रास होऊ लागला आणि त्याला केईएम रुग्णालयात घेवुन जाईपर्य ंत त्याची प्राणज्योत मावळली. आई आणि दोघी बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला. ऋतिक हुशार असुन त्याला अभ्यासाचा कोणताच तणाव नव्हता असे त्याच्या पालकांनी व शिक्षकांनी सांगितले. त्याचेवर कावीळीचा उपचार चालु होता. तरी देखील माध्यमांनी ऑऑअभ्यासाच्या तणावामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने ऋतिकचे निधनवळवळ अशी बातमी दाखवून दिली. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटना कोणतीही शहानिशा न करता हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचेसांगण्यात आले. यासाठी मानसिक तणाव हे एकच कारण पुढे करण्यात आले. टीआरपी वाढविण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहण्यास मिळाली. माध्यमं ही समाजाचा आरसा आहेत. कोणतीही घटना जशी घडली त्याप्रमाणे लोकांपर्य ंत पोहचविण्याचे काम माध्यमांचे आहे. परंतु या ठिकाणी आपले विचार दुसNयाच्या गळी उतरविण्याची स्पर्धा लागली. आपण जेसांगतो, जे दाखवतो ते लोकांना खरे वाटावे याकरीता भाग पाडले जात आहे. आपण मांडलेल्या मतांचा दुस/याच्या मनावर(हृदयावर) काय परिणाम होत असेल, याचा थोडा देखील विचार केला गेला नाही. विचारांचे विकार जडून लोकांत संभ््राम निर्माण करण्यात येत आहे. समाजात आपल्या विचारांना किती मोलाचे स्थान आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकेकाळी वयोवृध्द व श्रीमंतांचा आजार असणारा ऑहृदयविकारवळ हळुहळु तरुणाई पार करुन बालकांकडे वळू लागला आहे. परंतु हृदयविकाराचे खरे कारण काय ? का घडून येतो हृदयविकार ? हृदयविकाराचा झटका येण्याचे मानसिक तणाव हे एकच कारण असु शकते का ? आजच्या स्पर्धात्मक जगात कित्येकांना मानसिक तणावातुन जावे लागत आहे. याची कारणेकाय असतील ? यावर उपाय काय ? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिली आहेत.

शब्दांकन: श्री.अजित केसरकर 

ये १५ मिनिट तुमसे कोई छीन नहीं सकता



ये १५ मिनिट तुमसे कोई छीन नहीं सकता 


आयुष्य किती वर्ष या पेक्षा त्या आयुष्यातील तो किती क्षण जगला हे महत्वाच .कपिलच्या बाबतीत तो रिचर्डचा झेल आणि वर्ल्डकप असेल ,अजित वाडेकरांच्या बाबतीत तो सोबर्सला फॉलोओंन देण्याचा क्षण असेल ,चंद्रशेखरची कदाचित ओव्हल वरील नॉटची विकेट घेण्याचा क्षण असेल ,धोनीचा तो वर्ल्डकप जिंकताना मारलेला शेवटचा षटकार असेल ,प्रत्येकाचे हे क्षण ठराविकच असतात कि ते त्याची आयुष्यभर साथ देतात आणि त्याला त्यांच्या मृत्यू पश्चात अजरामर करतात .या त्यांच्या मखमली आठवणी अत्तराच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या असतात .दिनेश कार्तिक हा किती चांगला फलंदाज होता किंवा यष्टीरक्षक होता हे कुणालाही पुढे लक्षात राहील अस नाही ,कदाचित तो तेवढा मोठा फलंदाज आहे असही नाही .पण काल तो ते ८ चेंडू आपल आयुष्य जगला .चकदे मध्ये आहे ना "ये ७० मिनिट ,तुमसे कोई छीन नही सकता" तसच ती शेवटची १५ मिनिट दिनेश पासून आता कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही .त्यातील एक स्कूप सोडला तर बाकीचे फटके हे सगळे सरळ बॅटने खेळलेले ,वर्षानुवर्ष क्रिकेट भीष्मांनी वापरलेले होते कुठेही आडवा तिडवा ,रामभरोसे प्रकार नव्हता .शेवटचा कव्हर वरून मारलेला छकडा तर लाजबाब आणि हे डोक्यावर प्रचंड दडपण असताना .स्कोअर बोर्ड गाढव असतो हे अशावेळी सिद्ध होत .काही वर्षांनी लिहिलेल्या इतिहासात दिनेश कार्तिक नाबाद २९ एवढच दाखवेल पण त्यातील प्रत्येक धावे बरोबर भारत आणि बांगलादेश मधील लाखो ,करोडो क्रिकेट प्रेमीची अवस्था पुढील पिढीला समजणार नाही .अठराव्या ओव्हर मध्ये चार चेंडूवर एकही धाव नाही ,पाचवी वर लेग बाय आणि सहाव्या चेंडूवर विकेट हे बघताना भारतातील क्रिकेट प्रेमीच्या हृदयातील एकेक पणती कशी विझत जाऊन अंधार होत चालला होता आणि बांगला देश मध्ये कशी रोषणाई सुरु झाली होती हे पुढील पिढीला समजणार नाही .एकोणिसाव्या ओव्हरला पुन्हा भारतात एकेक पणती उजळत गेली ,विसाव्या ओव्हरला पहिल्या तीन चार चेंडूत पुन्हा हि ज्योत कशी वाऱ्याने फडफडायला लागली ,आणि शेवटच्या चेंडूवर एडिसनला जणू दिव्याचा शोध लागल्यासारखे कसा सगळीकडे लखलखाट झाला हि गंमत कळणार नाही .दिनेश कार्तिक हे क्षण ,हि पंधरा मिनिट यांच्यावर फक्त तुझा हक्क आहे .

शब्दांकन: वीरेन्द्रसिंह उत्पात 

Thursday, 22 March 2018

बदलती कुटुंब व्यवस्था कारणीभूत कोण?


बदलती कुटुंब व्यवस्था कारणीभूत कोण?




कुटुंब अशी एक संकल्पना आहे ज्यात  काळानुसार,प्रदेशानुसार,तसेच समाजानुसार अनेक बदल होत असतात.कुटुंब संस्था याच्या मुळाशी विवाह संस्था आहे.माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला निसर्गाने कामवासना बहाल केली आहे. मनुष्याला बुद्धी असल्याने कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि त्यात काळानुसार बदल होत गेले.काळाच्या मर्यादेनुसार कुटुंब व्यवस्थेत बदल घडत गेले.या बदलत समाजाने अनेक आक्षेप आणले.बदलीत्या कुटुंब व्यवस्थेचे कारणीभूत तंत्रद्य्नही आहे' कुटुंब व्यवस्थेत विवाह ला मुळाशी मानले जाते. निसर्गाने माणसासारखी प्रणययन कामवासना बहाल केली आहे पण बुद्धीच्या आणि विवेकच्या जोरावर मनुष्य जातीने कुटुंब व्यवस्था जन्माला  आणली.फार पूर्वी म्हणजे कृतीयुगी त्रिपुरुषाच्या मनात आले तर कोणाचाही,कोणाबरोबरही,व केव्हाही संभोग होत असे.आई ,बहीण,भाऊ,बाप वैगरे असा कोणताही भेद नव्हता .त्या नन्तर काळाने स्त्री-पुरुष हाताने स्पर्श करून संभोगण्याची इच्छा दर्शविण्याची चाल टोळीतील समाजाला मान्य झाली.त्याने हस्तग्रहण असे नाव देण्यात आले कालांतराने या स्पर्शापासून द्वंद्ववसंस्था म्हणजेच विवाह  संस्था निर्माण झाली.या संस्थेत आपली आईबहीण भाऊ काका मामा बाप आहेत हि कल्पना उदयास आली.विशिष्ठ नाती निर्माण झाली.
         या सर्व इतिहासाकडे नजर टाकली तर आपल्यला कुटुंब व्यवस्थेत काळानुसार अनेक बदल होताना दिसली.आज आपण जी नाती सहज पाने स्वीकारतो ती नाती या कुटुंब व्यवस्थेतील एक बदलच होय.सुरुवातील सर्व भाव बहिणीचे एकच घर होते .त्या नंतर संख्या भाऊ बहिणीचे एक घर झले त्या नंतर संख्या भाव भावांचे एक घर झाले . त्या नंतर आई,वडील,भाऊ,बहीण यांचा मिळून कुटुंब झाले .आणि आताची चौकोनी कुटुंब असे कुटुंब व्यवस्था बदलत गेली.
       या बदलाच्या मागची करणे जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्यला कुटुंब व्यवस्था लक्षात घ्यावी लागेल. कुटुंब व्यवस्था कशासाठी असते? तर सर्व काही सुरळीत चालण्यांसाठी असते .सामाजिक नीती आणि कायद्यची भितीयु या दोन्ही चाकांवर कुठलीही संस्था चालत असते. पण ज्या वेळी संस्थेतील काही घटकांना हि व्यवस्था आपल्यला फलदायी होत नाही असे वाटू लागते तेव्हा हे घटक त्या संस्थे मध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करत असतात.हि घटके या व्यवस्थेला आवाहन देऊन ती व्यवस्था नाकारतात व त्यातून बदल घडतात.
     बदल पुढेही घडत राहतील विज्ञान ,स्त्री शिक्षण, मत स्वातंत्र्य वैगरे घटक याला कारणीभूत होत आहेत आणि होणार आहेत. 
           आजच्या काळात या बदल मुले लेस्बियन गे पद्धती आपल्या हक्कांसाठी लढतात त्याचप्रमाणे कुटुंबपद्धती आता लिविंग रेलशनशिप वर येऊन थांबली आहे .आपल्या पसंदी दार  जोडीदार सोबत लग्न न करता एकत्र राहण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. थोडक्यात माणूस जाती आणि समाजच  बदलत्या कुटुंब व्यवस्थेची कारणे आहेत.

शब्दांकन: अश्विनी सुतार 

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है...


सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है...






शहीद भगतसिंग,ज्यांना २३ मार्च १९२१ ला वयवर्ष (२३ वर्ष पाच महिने व २३ दिवस) असताना ब्रिटिशांकडून सुखदेव व राजगुरू यांच्या समवेत फाशी देण्यात आली.जर भगतसिंगांना आपला जीव वाचवायचा असता तर ते इंग्रजांची माफी मागून आपला जीव वाचवू शकले असते परंतु भगतला मातृभूमी सोडून कोणासमोर झुकने माहीतच नव्हते!"जीवन हे आपल्या हिंमतीवर जगले जाते,दुसऱ्याच्या खांद्यावर तर प्रेत उचलले जाते" ही त्यांची विचारधारा होती!

भगतसिंग यांचे विचार हे गांधींच्या विचारांच्या विरुद्ध होते. आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपल्याला "ईट का जबाब पत्थर से देना होगा" ही त्यांची मान्यता होती!त्यांच्या जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पाकिस्तान येथील बंगा ह्या गावात झाला!
त्यांच्या जन्म झाला त्याच दिवशी त्यांचे वडील सरदार किशनसिंग व काका अजितसिंग यांची जेल मधून सुटका करण्यात आली,इंग्रजांच्या विरुद्ध बंड केल्याने त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते!देशप्रेमाचा बाळकडू त्यांना अश्याप्रकारे जन्मपासूनच घरातूनच मिळाला होता!त्यांना इंग्रजांप्रती इतका राग होता की ते इतर शिखांप्रमाणे लाहोरच्या ब्रिटिश शाळेत न जाता त्यांनी दयानंद वैदिक हायस्कूल मध्ये जाऊन शिक्षण घेतले.१९१९ मध्ये जेव्हा ते केवळ १२ वर्षाचे होते तेव्हा जालियनवाला बागेत हजारो निष्पाप लोकांनां मारण्यात आले,भगतसिंग यांच्या मनाला ही गोष्ट लागली व त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून बंदूक हातात घेतली व देशासाठी इंग्रजांना मारण्यास सुरवात केली.

त्यांचा गांधींच्या अहिंसा धोरणाला कायम विरोध होता, त्यांच्यामते केवळ अहिंसा धोरण अवलंबल्यामुळे चौरीचौरा मध्ये निष्पाप लोक मारले गेले होते.जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते शाळेत शिकत होते,त्यांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा ते ५० किलोमीटर चालून घटनास्थळी पोहचले,तेथील भयाण दृश्य पाहून भगतसिंगांना अपार वेदना झाल्या!त्यांनी तेथील रक्तात माखलेली माती घरी आणली व इंग्रजांकडून बदला घेण्याचे ठरवले!त्यानंतर त्यांनी युवकांना एकत्र केले व त्यांना "ईट जबाब पत्थर" हे तत्व शिकवले.

इंग्रज कामगारांच्या विरोधात एक बिल पास करणार होते,जे कामगारांच्या हिताचे नव्हते.चंद्रशेखर आझाद व भगतसिंगना ते मंजूर नव्हते.ह्याचा विरोध म्हणून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी ०८ एप्रिल १९२९ दिल्लीत सेंट्रल असेंबलीत बॉम्ब फेकला,बॉम्ब फेकण्याचा उद्देश कुणाचा जीव घेणे हा नव्हताच,केवळ बहिरेपणाचे ढोंग करणाऱ्या इंग्रजांना घाबरवणे हाच मूळ उद्देश होता,त्यासाठी बॉम्ब बनवताना त्यात अत्यल्प स्फोटक वापरण्यात आली होते.बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी स्वेच्छेने अटक करून घेतली,जेणेकरून हे बातमी देशभरात वणव्यासारखी पसरेल व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होईल!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना २३ मार्च १९३१ रोजी ७ वाजून ३३ मिनिटांनी फाशी देण्यात आली,अन ह्या पंजाबच्या वाघाने वयाच्या २३ व्या वर्षी हसत हसत फाशी जाणे पसंद केले. त्यादिवसापासून "भगतसिंग" "शहीद भगतसिंग झाले".

त्यांच्या ह्या बलिदानातून एक गोष्ट सिद्ध होते....

 "व्यक्ती ला मारून तुम्ही त्यांचे विचार दडपू शकत नाही".

अश्या ह्या अवलिया अन प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मनाचा मुजरा!

त्यांनी लिहलेल्या दोन ओळी खाली देत आहे ...........
.
.
.

मेरे सीने में जो जख्म है वो सब फूलो के गुच्छे है
हमें तो पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे है!
.
.
.

इनकलाब झिंदाबाद !

संदर्भ: शहीद भगतसिंग
शब्दांकन : वीरेन्द्रसिंह उत्पात 

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...